जागतिक पर्यावरण दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा विषय नसून, निसर्गाप्रती आपली जबाबदारी ओळखण्याची संधी आहे. वृक्ष आपल्याला प्राणवायू, सावली, अन्न आणि जीवन देतात. परंतु वाढत्या वृक्षतोडीमुळे निसर्गाचे संतुलन धोक्यात आले आहे. अशाच भावनेला शब्दबद्ध करणारी “वटवृक्षाचा दाह” ही कविता पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देते.
वटवृक्षाचा दाह
जमिनीत पाळंमुळं रोऊन,
एका रोपाचा वटवृक्ष झालो
असंख्य फांद्यांना जन्म देऊन,
निसर्गाचा पाईक झालो…!
प्रत्येक ऋतूत तटस्थ राहून,
कर्तव्याचं मी पालन करतो
सांगावं इथे कधी कुणाला,
प्राणवायू कमी पडतो..!
देता येईल जेवढं मला,
सर्वांना सुख मी देतो
माझ्या सावलीत तू,
थोडासा विसावा घेतो..!
वाऱ्यासंगे झुलताना,
नकळत मन शहारून जातं
पुन्हा एकदा मनात बहर फूलतो,
आणि तूझं ही मन प्रसन्न होतं .
स्वर्ग सुखाचे अजाण माणसा ,
माझं ऋण होतं तुझ्यावर
स्वार्थासाठी अनेकदा,
कुऱ्हाड मारलीसं माझ्यावर!
आता वटवृक्षाचा दाह,
तुला वेळोवेळी लागेल
शांत निद्रेसाठी …;
भिक मागावी लागेल!
सत्यवान सहदेव साटम
जानवली (कणकवली)
९८६०३१७८६०
कवितेचा आशय
या कवितेत वटवृक्ष स्वतःच्या भावनांना शब्द देतो. तो सांगतो की, जन्मापासून मानवाला सावली, प्राणवायू आणि संरक्षण देण्याचे कार्य तो निस्वार्थपणे करत आला आहे. मात्र मानवाने स्वार्थापोटी वृक्षतोड केली आणि निसर्गाचे मोठे नुकसान केले. याचे परिणाम भविष्यात मानवालाच भोगावे लागतील, हा या कवितेचा मुख्य संदेश आहे.
जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व
दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करणे आणि पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी लोकांना प्रेरित करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
निष्कर्ष
“वटवृक्षाचा दाह” ही कविता केवळ वृक्षाची व्यथा व्यक्त करत नाही, तर मानवाला निसर्गाशी असलेले नाते जपण्याची आठवण करून देते. आज गरज आहे ती अधिकाधिक वृक्षारोपणाची आणि पर्यावरण संरक्षणासाठी ठोस पावले उचलण्याची. “एक झाड लावा, पृथ्वी वाचवा!” 🌳
