आज सायंकाळी सर्व मीडिया व चॅनल्स वर एकच बातमी व्हायरल होती ती म्हणजे मुंबईतील भर पावसातील सर्वात मोठे रेस्क्यू ऑपेरेशन. मुंबईतील सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने प्रवाशांनी सायंकाळच्या वेळी मोनोरेलकडे धाव घेतली. मात्र मोनोरेलने देखील दगा दिला. अचानक पॉवर सप्लाय बंद झाल्याने गाडी चेंबूर आणि भक्तीपार्क स्थानकाच्या दरम्यान थांबली आणि प्रवासी आतमध्ये अडकून पडले.
दीड तास प्रवासी अडकले
सुमारे १ तास ३० मिनिटे प्रवासी मोनोरेलमध्येच अडकून राहिले. उष्णतेमुळे आणि हवा खेळती नसल्याने प्रवाशांचा त्रास अधिकच वाढला.
हेल्पलाइन व पोलिसांना कॉल
प्रवाशांनी आपत्कालीन परिस्थितीत थेट हेल्पलाइन नंबर, पोलीस व इतर आपत्कालीन संपर्क साधनांचा वापर केला. यामध्ये TV9 मराठीचे पत्रकार सागर शिंदे देखील मोनोरेलमध्ये अडकले होते. त्यांनी स्वतः प्रयत्न करून हेल्पलाइन आणि पोलिसांना संपर्क केला. तसेच त्यांनी TV9 चॅनलशी फोनवर समन्वय साधत प्रत्यक्ष घडामोडींची माहिती सतत दिली.
५८५ प्रवाशांची सुटका
अग्निशमन दल व आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. विशेष शिड्या व सुरक्षा साधनांच्या मदतीने सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. एकूण ५८५ प्रवाशांची सुरक्षित सुटका करण्यात आली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
चौकशी सुरू
प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली असून तांत्रिक कारण शोधले जात आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी मोनोरेल व्यवस्थापनाने अधिक दक्षता घेण्याचे आश्वासन दिले आहे.
